येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

वैदर्भीय राजकारणातील वाढता दबाव 'बंजारा'

sanjay rathod

संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.


संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तेव्हापासून आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तयार व्हायला लागली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.त्यामुळे येथे  शिवसेनेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीच नाकारणार नाही.


यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या तत्कालीन ग्रुह मंत्री माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान देत दारव्हा मतदारसंघातून 2004 मध्ये ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.


2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा  देखील पराभव केला.


राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधत राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा देखील पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी राठोड विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागणे निश्चित मानले जात होते. त्या अनुषंगाने संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री झाले होते.यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री देखील होते. 


mla sanjay rathod


संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मात्र वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचे समजते आहे.


 वनमंत्री पदासाठी संजय रायमुलकर हे देखील इच्छूक असल्याचे समजले असून ते सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आले आहेत. विदर्भातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं.


त्यांच्यासह अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून विधानपरिषदेवर असलेले गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे आमदार देखिल मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.


दिग्रस मतदार संघ कायम बंजाराबहुल भाग आहे. बंजारा मतं ही मतदारसंघात निर्णायक समजली जातात. हा वर्ग ज्या उमेदवाराकडे जाईल, त्याचा विजय निश्चित समजला जातो. याचाच फायदा घेऊन या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. पुढे बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड यांचं नाव महाराष्ट्रात घेण्यात येऊ लागलं.


संजय राठोड हे बंजारा समाजाचे मोठे नेते असून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर जे काही नेते बंजारा समाजाला आपले वाटतात त्यापैकी संजय राठोड यांचं स्थान अगदी वरचं आहे.


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं निर्णायक मतदान आहे. या लोकसभा मतदारसंघात जवळपास पाच लाख इतकं मतदान हे बंजारा समाजाचं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या